Wednesday, September 25, 2013

रंगाचे जग


रंगाचे जग
रंग बरसे भिगे चुनरीयारे रंग बरसे ! हे गाणं मनाला नुसत भावतच नाही तर रंग मनसोक्तपणे खेळण्यास  प्रेरित करते. रंगाचे आणि मानवाचे नाते हे इतके घट्ट आहे हे शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. रंगपंचमीचा सण असो अथवा होळीचा सण रंगाची उधळण ही नवचैतन्य निर्माण करते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्याची आपली पद्धत फारच जुनी आहे. रांगोळी ही भूमितीय, गणितीय रचना तसेच पाने, फुले अशा विविध आकाराने सजलेली असते. त्यातही ठिपके जोडून विविध रंग भरून त्यास सजविले जाते. अशा ह्या रांगोळीतून रंगसंगती साधून योग्य तो संदेशही दिला जातो. जरा आपण वेगळा विचार केला जसे रंगच नसते तर ! मग हे जग आपणास निरुत्साही, उदास वाटले असते. पूर्वी कृष्ण धवल दूरदर्शन घराघरात असायचा आता आपणास तो शोधूनही सापडणार नाही. रंगीत टेलीव्हिजनने जी मोहिनी घातली ती कमी होणारच नाही. रंग हा निसर्गाने दिलेला अमुल्य ठेवा आहे. हजारो वर्षापासून मानव त्याचे जतन करत आला आहे. त्यातच रासायनिक रंगाची भर अलिकडे पडत आहे.
प्राचीन काळापासून मानवाने रंग बनविण्याच्या विविध पद्धती शोधून काढल्या. त्याच्या साह्याने गुहेमध्ये विविध कथा चित्राच्या माध्यमातून काढल्याचे आढळते. आज हजारो वर्ष झाली तरी बऱ्याच गुहेमधील चित्राचे रंग फिकट झाले नाहीत हे विशेष. गेरू, चिकणमाती, पिवळसर तांबूस माती हे मानवाने वापरलेले पहिले रंग आहेत. आपले पूर्वज मन्जीस्ठा वनस्पतीच्या मुळीपासून लाल रंग काढायचे ते सुती कापडावर टाकल्यावर जांभळा रंग मिळायचा. ह्याच्या मूळया ओषधसाठी तर वापरायचे परंतु रंग देण्यासाठी यांचा वापर व्हायचा ह्यामध्ये अलीझरीन नावाचे रसायन असल्याने त्यास रंग यायचा.
खरे तर रंगामध्ये पिग्मेन्ट (Pigment) वर्णक आणि डाय (Dye) रंजक हे दोन पदार्थ असतात. हे दोन्हीही सारखे नसून त्यामध्ये मुलभूत फरक आहे. तो म्हणजे विरघळण्याचा. रंजक हा (पाण्यात) द्रावणात विरघळतो तर वर्णक हे द्रावणात अप्स्करीत (Dispersion)होतात. समजा लोखंडाचा गंजलेला चुरा पाण्यात टाकला. त्यात पांढरा सुती कपडा बुडवल्यावर तपकिरी रंग मिळतो. तो वाळवून परत धुतल्यावर आयर्न ऑक्साईडचे कण खाली पडतात. ह्यावरुन लक्षात येते की आयर्न ऑक्साईड पाण्यात विरघळत नाही तर तो अप्स्करीत होतो. पाण्यात मात्र अलीझरीन हे रसायन टाकल्यावर तो विरघळतो. त्यात कापड बुडवल्यावर त्यास कायमस्वरुपी लाल रंग मिळतो. येथे आयर्न ऑक्साईड हा वर्णक आहे तर अलीझरीन हा रंजक आहे.
रंग हे सेंद्रीय व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात. त्यामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम असे प्रकार आढळतात. रंजक हे पारदर्शक पांढरा आणि रंगीतही असतो. झिंक, लीड ऑक्साईड आणि टिटानियम ऑक्साईड हे पांढरे रंजक आहेत. पारदर्शक रंजकाचा  वार्नीश, पेन्ट, पॉलिश ह्यामध्ये वापर केला जातो. त्यात कॅल्शीयम कार्बोनेट, मॅग्नेशियम सिलिकेट व बेरियम सिलिकेट असते. रंगीत रंजकमध्ये नैसर्गिक खनिजे असतात. आयर्न ऑक्साईड हा विविध रंगात आढळतो. भारतीय लाल, स्पनिश लाल, पर्शियन लाल हे सर्व रंग आयर्न ऑक्साईडची आहेत. नीलमणी हे नैसर्गिकरीत्या आढळतो. त्याच्या गडद रंगाने तो मोहिनी घालतो त्याचमुळे त्याचा वापर सुवर्ण अलंकारात आणि नक्षीकामात केला जातो. फेरीक फेरोसायनायड हे निळे रंजक म्हणून वापरतात. त्यास पुर्शियन ब्ल्यू म्हणतात. अशी विविध रसायने कृत्रिमरीत्या तयार केली जातात. त्याचा उपयोग वाहन उद्योगात, पेन्ट आणि शाई तयार करण्यासाठी केला जातो. कापड, प्लास्टिक, सिमेंट, सोंदर्य प्रसाधने ह्यामध्येही मोठया प्रमाणात याचा वापर केला जातो. काही रंगद्रव्ये गंजरोधक म्हणून वापरतात. अशा रीतीने आपल्या रोजच्या जीवनात विविध रंगद्रव्ये उपयोगात येतात.
निसर्गातील वनस्पती, प्राणी यांना  रंगाचा वापर  कसा ? कुठे ? आणि केव्हा करायचा याचं ज्ञान नक्कीच असते.  त्या ज्ञानाच्या आधारे ते आपले अस्तित्व टिकवून आहेत. वर्णक हा आपल्या जैवविविधतेचा महत्वाचा भाग आहे.  सस्तन प्राण्यातील त्वचेला, केसांना काळा, राखाडी, तपकिरी व लाल हे रंग मेलानीन ह्या वर्णकामुळे येतो. त्याचमुळे शरीराचे अतिनील किरणापासून संरक्षण होते. ह्या वर्णकाचा उपयोग बरेच प्राणी स्वताचे संरक्षण करण्यासाठी करतात. मादागास्करच्या जंगलात रंग बदलणाऱ्या  सरडयाच्या विविध प्रजाती आढळतात. त्यांच्या त्वचेतील रंगबदल हा फक्त वातावरणात सामावण्यासाठी नाही तर वेगळा  मूड व्यक्त करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. काही प्राणी हे आपल्या शरीराचा रंग असा बदलतात की शत्रू त्यांना त्या परिसरात ओळखूच शकत नाहीत. काही सरडे हे रंगीबेरंगी असतात. ते आपल्या त्वचेचा रंग शरीराचे तापमान नियंत्रित करून बदलतात. ह्या रंग बदलामधून ते शत्रूस चेतावनी देतात. हे रंग बदलण्याचे कारण म्हणजे यांच्या शरीरातील होणारी  उष्णरासायनिक प्रक्रिया होय. येथे रंगाची प्रखरता त्याच्या शरीरातील तापमानानुसार बदलते. अधिक तापमानास वेगळा रंग तर कमी तापमानास वेगळा रंग दिसतो. सरडे हे ह्याच्या साह्याने आपल्या त्वचेवरील रंग बदलून आपल्या भावना व्यक्त करतात. पुनरुत्पादनाच्या काळातही त्वचेतील बदल हा मादीस आकर्षित करण्यास उपयुक्त ठरतो.
वनस्पतीच्या पानांचा रंग क्लोरोफिल ह्या वर्णकामुळे हिरवा असतो. त्याच्या साह्याने ते स्वताचे अन्न तयार करतात. लिंबू, संत्री, द्राक्षे यांचा रंग पिवळा असतो. त्यामध्ये   फ्लेव्होनॉयड हा वर्णक असतो. हे रसायन आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. फळे पिकले किंवा नाही हे रंगावरुनच ओळखले  जाते. त्याच्या रंगातील बदल हा अॅन्थोसायनीन ह्या वर्णकामुळे येतो. टोमाटोला लाल रंग लायकोपीनमुळे तर गाजराला फिकट तांबूस रंग बीटाकेरोटीनमुळे येतो. एवढेच नाहीतर पालक, चुका व इतर हिरव्या भाज्यांना हिरवा रंग क्लोरफिल ह्या वर्णकामुळे येतो. बरीचशी फुले ही रंगीत असण्याचे कारण म्हणजे त्याकडे किडे, कीटक, पक्षी आकर्षित व्हावे त्यातूनच परागकणाचे वहन होऊन पुनरुत्पादन व्हावे हा उद्येश असतो. सजीव हे वर्णकाचा उपयोग हे त्याची वाढ, सुधारणा, संरक्षण व पुनरुत्पादन ह्यासाठी करतात. निसर्ग हे रंगावर अवलंबून आहे. जर रंगच नसते तर सजीव सृष्टी टिकू शकली नसती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

                                    प्रा. शामकुमार देशमुख 
                                    deshmukhnano@yahoo.com
                                   






























No comments:

Post a Comment